। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई येथील तुर्भे एमआयडीसी भागात असणाऱ्या डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी (दि.27) सकाळी भीषण आग लागली. या आगीत कचऱ्याचे मोठे ढिग जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.
वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, एरोली, बेलापूर तसेच एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वाशी अग्निशमन दलाने दिलेल्या माहिती नुसार आग लागल्याची वर्दी पहाटे पाच वाजता मिळाली. तात्काळ घटनास्थळी अग्निशमन पथक रवाना झाले आहे.
रहिवासी वस्ती असल्याने रुग्णवाहिका रवाना झाली आहे. अद्याप पर्यंत तरी कुठलीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. असेही त्यांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वीही अनेकदा येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात उन्हाच्या झळ्या लागत असल्याने कचरा कडक वाळतो. त्यामुळे एखादी ठिणगी पडली तरी आग लागते आणि झपाट्याने सर्वत्र पसरते. असा अनुभव असला तरी आज सकाळी सकाळी आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्षेपण भूमी असली तरी परिसरात शाळा आणि झोपडपट्टीची दाट वस्ती असल्याने तेथ पर्यंत आग पसरू नये याची काळजी घेतली जात आहे. डंपिंग ग्राउंडला आग लागल्यावर अनेक दिवस धूमसते असा अनुभव असल्याने त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.







