नागाव समुद्रकिनारा येथे ढासळलेला बंधारा चिंतेचा विषय
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेल्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर उभारलेला दगडी सुरक्षा बंधारा सध्या ठिकठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरती-ओहोटीमुळे सैल झालेले मोठे दगड किनाऱ्यावर आणि पाण्यात विखुरलेले दिसत आहेत. त्यामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांसह सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या स्थानिक नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी बंदर विभागामार्फत हा दगडी बंधारा भारण्यात आला होता. प्रारंभी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला; मात्र कालांतराने काही भाग खचल्याने दगड सैल झाले आहेत. भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्यानंतर या दगडांमधून मार्ग काढताना पर्यटकांचा तोल जाण्याच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. किरकोळ दुखापतींच्या काही घटना समोर आल्याचेही सांगण्यात येते.
नागाव किनाऱ्यावर स्थानिकांच्या उपजीविकेसाठी लहान-मोठे स्टॉल्स, खाद्यपदार्थ विक्रेते व विविध पर्यटन सेवा उपलब्ध आहेत. मात्र, बंधाऱ्याच्या सध्याच्या स्थितीमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, सैल दगड हटवावेत तसेच धोकादायक भागात चेतावणी फलक, दोरखंड किंवा तात्पुरते कुंपण उभारावे, अशी मागणी केली आहे. सुरक्षेसाठी उभारलेला बंधारा जर स्वतःच धोकादायक ठरत असेल, तर मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. पर्यटकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.







