| तळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील जंगल परिसरात रानमेवा उपलब्ध होऊ लागल्याने आदिवासी भगिनींना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. सध्या काजू, हिरवी करवंदे, आंब्याच्या कैऱ्या, रानबोर, शेवग्याच्या शेंगा तसेच ओले काजूगर मोठ्या प्रमाणात तयार झाले असून हा रानमेवा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. आदिवासी भगिनी पहाटेपासून जंगलात जाऊन हा नैसर्गिक मेवा गोळा करतात आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणतात. दिवसभराच्या मेहनतीनंतर त्यांच्या हातात चार पैसे मिळू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात या उत्पन्नातून घरखर्चाला हातभार लागून सण गोड करण्यास मदत होत आहे. चैत्र-वैशाख महिन्यात विविध प्रकारचा रानमेवा उपलब्ध होणार असून जंगलातील सुगंधाने परिसर दरवळणार आहे. रानमेव्याच्या विक्रीमुळे आदिवासी कुटुंबांना हंगामी रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.







