तीन दिवसांत कारवाईतून 11 लाखांचा दंड वसूल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांना जिल्हा वाहतूक शाखेने दणका दिला आहे. तीन दिवसांमध्ये कारवाईतून 11 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईने या चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रायगड जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. समुद्रकिनाऱ्यांसह गड किल्ले व अन्य पर्यटनस्थळी फिरण्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची जिल्ह्यातील पर्यटनस्थळी अलोट गर्दी होते. शनिवार व रविवारी या आठवड्याच्या सुट्टीत पर्यटक दाखल होऊन सुट्टीचा आनंद लुटत असतात. पर्यटकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी फलक लावण्याचे काम केले जात आहे.
हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट असणे, ज्यादा वाहतूक प्रवास करणे, अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 28 फेब्रुवारी ते दोन मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत एक हजार 128 चालकांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून 11 लाख 37 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये 28 फेब्रुवारीला 414 चालकांविरोधात कारवाई करून चार लाख 14 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 1 मार्चला दिवसभरात केलेल्या कारवाईत 390 चालकांकडून तीन लाख 88 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच दोन मार्चला झालेल्या कारवाईत 324 चालकांकडून तीन लाख 34 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.






