। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर परिसरात अमली पदार्थविरोधी कक्षाने धडक कारवाई करत आठ लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर-21 मधील सम्राट अशोक इमारतीमध्ये राहणारे दोन व्यक्ती राहत्या घरात अमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने इमारतीमधील संशयित घरावर छापा मारला. घराची झडती घेतली असता संशयित आरोपी ऋषिकेश मिश्रा (21) याच्या ताब्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. 4 लाख 42 हजारांचा 44.26 ग्रॅम हायड्रो गांजा, 2 लाख 37 हजारांचा 6.79 ग्रॅम मेफेड्रोन आणि 1 लाख 26 हजारांच्या 3.17 ग्रॅमच्या एमडीएमएच्या एकूण सात गोळ्या असा एकूण 8 लाख 7 हजारांच्या अमली पदार्थाचा समावेश आहे. पोलिसांच्या चौकशीत हा अमली पदार्थ खारघर सेक्टर-12 येथील एकता ॲव्हेन्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या केतन यादव (21) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी केतनलाही अटक केली आहे.






