थकीतदारांना वीजपुरवठा खंडित होण्याचा शॉक
| रायगड | प्रमोद जाधव |
वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे विजेच्या वापरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, विजेचा वापर करूनही अनेक ग्राहक वेळेवर वीजबिल भरत नसल्यामुळे त्याचा आर्थिक फटका महावितरण कंपनीला बसत आहे. रायगड जिल्ह्यात सध्या तब्बल 14 कोटी रुपयांहून अधिक वीजबिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. या थकबाकीत लहान-मोठ्या उद्योगांसह विविध कारखान्यांचाही समावेश आहे. वेळेत वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो, त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 25 हजार वीजबिल थकीतदारांना महावितरणचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही रायगड जिल्ह्यात महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. लाखो नागरिकांपर्यंत वीजपुरवठा पोहोचविण्याचे काम महावितरण कंपनीमार्फत केले जात आहे. घरगुती वापरासोबतच व्यावसायिक, व्यापारी, उद्योग, कारखाने तसेच सरकारी कार्यालयांनाही वीजपुरवठा केला जातो. दर महिन्याला वेळेवर वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून सातत्याने केले जाते. मात्र काही ग्राहकांकडून दर महिन्याला बिल न भरल्याने थकबाकी वाढत चालली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत लहान-मोठे उद्योग करणाऱ्या 5 हजार 64 ग्राहकांनी तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांचे वीजबिल थकविले आहे. कारखानदारीचा व्यवसाय चालविणाऱ्या 285 ग्राहकांकडून एक कोटी साठ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर घरगुती वीज वापर करणाऱ्या 19 हजार 970 ग्राहकांकडून आठ कोटी वीस लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. अशा प्रकारे एकूण 25 हजार 319 ग्राहकांनी मिळून 14 कोटी एक लाख रुपयांचे वीजबिल थकविले असून, त्याचा आर्थिक भार महावितरण कंपनीवर पडत आहे. मार्चअखेरपर्यंत ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात विविध पथके तयार करून थकीतदारांकडून वसुलीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचे कर्मचारी थकीत ग्राहकांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात कडक कारवाईही केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील 7 हजार 580 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी केले आहे.
रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संकट
मागील काही महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या तीन तारखेला महावितरण कंपनीचे कर्मचारी घराघरांत जाऊन मीटरची रिडींग घेत असत आणि त्या आधारे वीज वापराचे बिल देत होते. तसेच ग्राहकांना वेळेवर बिल भरण्याचे आवाहनही करण्यात येत होते. मात्र, स्मार्ट मीटर प्रणाली लागू झाल्यानंतर कार्यालयातूनच रिडींग आणि वीज वापराची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका क्लिकवर वीज वापराची संपूर्ण माहिती महावितरण कंपनीला उपलब्ध होत असल्याने प्रत्यक्ष जाऊन मीटर रिडींग घेण्याची गरज कमी झाली आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्मार्ट मीटरमुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
थकीतदारांवर दृष्टीक्षेप
| वर्गवारी | ग्राहक | रक्कम (रुपये) |
| घरगुती | 19970 | आठ कोटी 20 लाख |
| व्यापारी | 5064 | चार कोटी 30 लाख |
| औद्योगिक | 285 | एक कोटी 60 लाख |
| एकूण | 25,319 | 14 कोटी एक लाख |
पथदिव्यांचे 96 कोटी थकीत
जिल्ह्यातील गावे, अंधारात राहू नये म्हणून महावितरण कंपनीकडून पथदिव्यांमार्फत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात गावे, वाड्यांमध्ये ठिकठिकाणी पथदिव्यांचे जाळे पसरले आहे. या पथदिव्यांचे वीज बील ग्रामपंचायतीकडून भरले जाते. मात्र, 96 कोटी रुपयांचे पथदिव्यांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे बिल कोण भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.







