निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील तब्बल 43 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने सध्या त्या ठिकाणी प्रशासकांकडून कारभार पाहिला जात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींची मुदत संपली, तर जानेवारी महिन्यात एका ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला. यापूर्वीच 19 ग्रामपंचायतींवर प्रशासक कार्यरत होते. त्यामुळे सध्या एकूण 43 ग्रामपंचायतींवर प्रशासकांमार्फत कारभार चालवला जात आहे. नियमानुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक होईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले असून, तेथील दैनंदिन प्रशासकीय कामकाज त्यांच्याकडून पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, तरघर आणि उलवे या ग्रामपंचायतींवर 2020 पासूनच प्रशासकांकडून कारभार सुरू आहे. त्यामुळे या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा नागरिकांना अधिक काळापासून करावी लागत आहे. सध्या प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदई, चिपळे, जांभिवली, कर्नाळा, कुंडेवहाळ, नांदगाव, पळस्पे, पारगाव, पोयंजे, शिरवली, तरघर, उलवे, वावंजे, वहाळ, वांगणी तर्फे वाजे, गव्हाण, वडघर, चावणे, कराडे खुर्द, साई, सांगुर्ली, पाले बुद्रुक, आकुर्ली, कोळखे, पाली देवद, नानोशी, हरिग्राम, बारवई, खैरवाडी, खानाव, मोरबे, खानावळे, सावळे, देवलोली, पोसरी, वाकडी, वाजे, उमरोली, केवाळे, ऊसरली, आपटा, वलप आणि वारदोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक विकासकामांवर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणुका लवकर जाहीर करून लोकप्रतिनिधींमार्फत ग्रामपंचायतींचा कारभार सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






