माजी नगरसेविकेच्या पतीची अनधिकृत इमारत सिडकोने पाडली
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीतील रोडपाली गावात उभारण्यात आलेल्या अनधिकृत पाच मजली इमारतीवर सिडको प्रशासनाने मोठी तोडक कारवाई केली. संबंधित इमारत भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेविका प्रिया भोईर यांचे पती विजय काना भोईर यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्रीकांत पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत कोणतीही वैध परवानगी न घेता उभारण्यात आली होती. त्यामुळे नियमानुसार कारवाई करत पोखलनच्या सहाय्याने इमारतीचा मोठा भाग जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान सिडकोचे जवळपास 40 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कळंबोली पोलीस ठाण्याचे कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान इमारतीची वीज जोडणी तोडण्यात आली असून, पाण्याची टाकीदेखील उद्ध्वस्त करण्यात आली. उर्वरित बांधकामही लवकरच पाडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय वर्तुळात आश्चर्य
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका प्रिया भोईर यांच्या पतीच्या नावावरील इमारतीवरच सिडकोने कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, प्रिया भोईर यांचे पती विजय भोईर हे भाजपचे विधान परिषद आ. विक्रांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. असे असतानाही ही कारवाई झाल्याने, भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा हा भाग असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.





