| माथेरान | प्रतिनिधी |
दरवेळी ऐन सुट्टयांच्या हंगामात येथील दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या पार्किंगच्या ठिकाणी अपुऱ्या जागे अभावी पार्किंगची सुयोग्य पद्धतीने सुविधा उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे पर्यटकांना नाईलाजाने माघारी जावे लागत होते. तर घाट रस्त्यावर ट्रॅफिक जाम व्हायची. याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत असे.
आगामी मे महिन्याचा खऱ्या अर्थाने पर्यटन हंगाम लक्षात घेता कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दस्तुरी भागातील बोरीचे मैदानासमोरील जागा पूर्णपणे साफ करून घेतली असल्याने जवळपास दीडशे पेक्षा ही अधिक वाहने अगदी सहजपणे पार्क होऊ शकतात. दस्तुरी जवळील एमपी प्लॉट 93 हा अद्यापही नगरपरिषदेकडे हस्तांतरण झालेले नाही. ह्या प्लॉटचे हस्तांतरण केव्हा होईल याबाबत अनिश्चितता वाटत असल्याने दरवर्षी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पर्यटन वाढीसाठी हे एक महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे. पर्यटन वाढले तरच इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने माथेरानचे प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी याठिकाणी आगामी काळात सुसज्ज वाहनतळ उभे राहिल असा विश्वास असून, त्याप्रमाणे गावाच्या हितावह कामे पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत चौधरी यांनी कंबर कसली आहे.
पर्यटकांची संख्या वाढली तरच सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटन शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी ते हॉटेल व्यावसायिक यांना पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे.पर्यटन वाढीसाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.
चंद्रकांत चौधरी
नगराध्यक्ष माथेरान नगरपालिका





