भाजपचे मंगेश वाकडीकर अध्यक्ष; राष्ट्रवादीचे मधुकर पाटील उपाध्यक्षपदी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे महायुतीतील नेते सत्तेच्या गणितासाठी आता एकाच मंचावर आल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणूकीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण बसणार, याकडे गेले कित्येक दिवसांपासून लक्ष लागून राहिले होते. अखेर गुरुवारी याबाबत महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड जाहिर केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेत सव्वा वर्षांचा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून पहिले सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष असेल तर त्यानंतर राष्ट्रवादी व शिंदे गटाला संधी देण्याची आखणी झाल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीत एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे महायुतीतील नेते सत्तेच्या समीकरणासाठी आता एकत्र आल्याने जिल्हा परिषदेत नवे राजकीय नाट्य रंगले आहे.
प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे मंगेश वाकडीकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पिठासन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी ही निवड जाहीर केली. मात्र या निवडीत शिंदे गट शिवसेनेला फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली.
अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात निवड प्रक्रीया पार पडली. अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. या दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाले. दुपारी दोननंतर निवडीच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपसह राष्ट्रवादीने जल्लोष साजरा केला. आनंदोत्सव साजरा होत असताना मात्र अर्ज भरताना शिंदे गटातील काही सदस्य गैरहजर असल्याचे दिसून आले. अध्यक्ष व उपाध्यक्षपद सव्वा वर्षाच्या बोलीवर असणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी व शिंदे गटाला संधी मिळणार आहे. मात्र या कालावधीत शिंदे गटाची काय अवस्था होणार हे लवकरच दिसून येणार असल्याची चर्चा आहे.
सत्ता स्थापनेत शिंदे गटावर नमते होण्याची वेळ
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह भाजपला आव्हान देत शिंदे गट शिवसेनेने निवडणूक एकला चलो रे या पध्दतीने लढविली. शिंदे गटाने प्रचारादरम्यान भाजपसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे धिंडवडे काढले. आपलाच अध्यक्ष असणार असा बतावण्या केल्या. मात्र बहूमत असतानादेखील त्यांना विरोधकाच्या बाकावर बसण्याची वेळ आली होती. भाजप राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे लक्षात आल्यावर शिंदे गटाची अवस्था दयनीय झाली. भाजप व राष्ट्रवादीला उध्दव ठाकरे व काँग्रेसनेदेखील पाठींबा दर्शविल्याची चर्चा झाल्यावर शिंदे गटाची अवस्था शेळीसारखी झाली होती. जास्त उमेदवार असूनही विरोधक म्हणून बसावे लागणार ही नामुष्की शिंदे गटाला सहन झाली नाही. अखेर नमतेपणा घेत जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलोची भूमिका शिंदे गटाने घेतली. मात्र हा निर्णय जनतेच्या विकासासाठी नसून स्वतःच्या विकासासाठी आहे, अशी टीका मतदारांकडून केली जात आहे.
अर्थ व बांधकाम सभापतीपदाची आस
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (दि.12) दुपारी झाली. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे मधुकर पाटील बिनविरोध निवडून आले. आता विषय समितीच्या सभापतीपदाकडे लक्ष लागून राहिले आहे. अर्थ, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण सभापतीपदाची निवडणूक येत्या 23 मार्चला होणार आहे. अलिबागमधील नियोजन भवन येथे दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. प्राधिकृत अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीतही अर्थ व बांधकाम सभापतीपदाची आस शिंदे गटाला आहे. परंतू त्यांची ही अपेक्षा पुर्ण होणार नसल्याची चर्चा समोर येत आहे.
शिंदे गटाच्या सदस्यांची बैठकीत पाठ
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भाजपसह राष्ट्रवादीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मात्र शिंदे गटातील 21 सदस्यांपैकी फक्त सहा सदस्यांनी या बैठकीत हजेरी लावली. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांची बैठकीत पाठ असे चित्र दिसून आले आहे.
शिंदे गटाचे वांदे
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा भाजपकडे आणि उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आली आहे. भाजप, राष्ट्रवादीसोबत आता शिंदे गटाने देखील सत्तेत येण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सध्याचे अध्यक्षपद हे सव्वा वर्षाचे असणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडे सव्वा वर्षे अध्यक्षपद देण्याचे ठरले आहे. परंतु या राजकीय खेळीत शिंदे गटाची मोठी गोची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सत्तेत जाऊनही शिंदे गटाचे वांदे झाले असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रीया पुर्ण झाली आहे. भाजपचे मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. महायुती एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये उध्दव ठाकरे गट शिवसेना व काँग्रेसचाही पाठींबा आहे. ही प्रकीया पुर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुतीच्या पक्षातील प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनातून लवकरच जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळेल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.





