वातावरण बदलाचा बागायतदारांना फटका; बहरलेल्या कैऱ्या करपल्या
| कापोली | प्रतिनिधी |
सध्या दिवसा उन्हाचा कडाका वाढू लागल्याने वाढत्या उष्णतेमुळे कैऱ्या काळवंडण्यास सुरुवात झाली. रात्री थंडी, दिवसा उष्मा आणि ढगाळ वातावरण असल्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सुरुवातीस बऱ्यापैकी थंडीचा जोर होता. मात्र, अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडावरील मोहोर काळवंडला असून, कैऱ्या करपल्या आहेत. असे वाटत होते की, यंदा आंबा बागायतदारांना मजबूत भाव देऊन जाईल. मात्र, हा अंदाज फोल ठरवत अनपेक्षित मोहोर करपून कैऱ्या गळण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने झाडाखाली कैऱ्या आणि मोहराचा थर साचला आहे.असे विदारक चित्र पाहून बागायतदारांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याच्या झाडांची बऱ्यापैकी फूट झाली आहे. परंतु, हा आंबा ही आता धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने आंबाच्या झाडांना मोहोर नीट फुललाच नाही. मात्र, त्यानंतर जानेवारी अखेरपासून हवामानातील बदलामुळे परागकणावर परिणाम झाला. मात्र, अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडांवरील शिल्लक मोहोर करपून गेला आहे. याआधी आलेली फळधारणादेखील कमी झाली. कैऱ्या करपून तसेच गळती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
बदलत्या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लाल कोळी, भुरी रोग यातून मोहोर काळा पडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे आंब्यांची देखभाल व कीटकनाशक फवारणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. थ्रीप्स व तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधांच्या फवारणीनेही आंबा पिकावरील रोग पूर्णपणे नियंत्रणात येत नाही. यंदा आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आंबा विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आंबा महागला तर ग्राहकांच्या खिशाला खात्री लागणार हे निश्चित.आंब्याला आलेला मोहोर पाहून यंदा आंबा खवय्ये देखील खूष होते. मनसोक्त आंबे खायला मिळतील हा आनंद मोहोर करपल्याने करपून गेला असे लोकं म्हणू लागली आहेत.
बागांची पाहणी करण्याची मागणी
वेळ न दवडता श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावातील आंबा बागायतदारांच्या बागांना भेटी देऊन कृषी अधिकाऱ्यांकडून बागांची पाहणी करणे आवश्यक असून, बागायतदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे. दरम्यान, यंदा परतीचा पाऊस अधिक लांबल्याचा आणि वातावरणातील वाढत्या उष्म्याचा आंबा पिकावर परिणाम झाला असल्याने ही परीस्थिती उद्भवली आहे असे जाणकारांकडून म्हटले जाते.







