आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच; तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल
। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यात नागरिकांची अनेकदा आर्थिक फसवणूक झाली आहे. तरीही उरणमधील नागरिक या घटनेतून बोध घेताना दिसून येत नाही. अनेक वेगवेगळे चिट फंडची उदाहरणे ताजी असतानाच उरण तालुक्यातील सारडे गावात पैसे डबल करण्याच्या नादातून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांच्या आर्थिक प्रश्नाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उरणमधील अनेक चिट फंड घोटाळ्यांनंतर सारडे गावामध्ये आणखी एक चिटफंड घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून 17 गुंतवणूकदारांकडून तब्बल 3 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणातील एकाच कुटुंबातील तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण पाटील (46), विनायक पाटील (43) आणि कमिक्षा पाटील (37) हे तिघेही सारडे गावातील रहिवासी असून त्यांनी वर्षभरापूर्वी चिटफंड नावाची एक गुंतवणूक योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास अवघ्या 15 दिवसांत भरघोस परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी ग्रामस्थांना दाखवले होते. तसेच एका आयडीसाठी 11 हजार रुपये गुंतवल्यास 15 दिवसांनंतर 19 हजार रुपये परतावा दिला जाईल, असा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला होता. आरोपींनी सुरुवातीला काही लोकांना परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गावातील अनेक लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली. या प्रकरणातील एका तक्रारदाराने चिटफंडमध्ये 26 लाख 7 हजार रुपये (237 आयडी) गुंतवले होते. त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर 17 प्रमुख गुंतवणूकदारांसह अनेक लोकांनी या चिटफंड योजनेमध्ये एकूण 2769 आयडी मिळून 3 कोटी 30 लाख 66 हजार रुपये गुंतवले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूक केलेली मुद्दल किंवा परतावा न देता आरोपींनी या रकमेचा अपहार केला. गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली असता आरोपींनी आपल्या घराला कुलूप लावून नातेवाईकांसह गावातून पळ काढला.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर फसवणूक झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उरणमध्ये अशा आर्थिक फसवणूकीच्या, पैसे डबल करण्याच्या व त्यातून आर्थिक फसवणूकीच्या घटना वारंवार घडत असून नागरिक यातून कोणताही बोध घेत नसल्याने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.






