‘बंटी-बबली’सह दोघे अटकेत, तिसरा फरार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकावर बोलावून एका तरुणाचे अपहरण करून हनीट्रॅपच्या माध्यमातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि ऑनलाइन कर्ज काढून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कर्जत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी फरार आहे.
8 मार्च रोजी आरोपी आदिती रमेश ढोके (25) हिने फिर्यादी तरुणाला कर्जत रेल्वे स्थानकावर भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिचे साथीदार सुशील देवराम जाधव (29) आणि गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान यांच्या मदतीने त्या तरुणाला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून भिसेगाव येथील न्यू बिकानेर स्वीट्स परिसरातून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. 9 मार्चच्या सकाळपर्यंत फिर्यादीला आदिती ढोके हिच्या फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. आरोपींनी चॉपरचा धाक दाखवत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देत सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व दोन अंगठ्या, तसेच 15 हजार रुपये रोख लुटले. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, चार डेबिट कार्ड आणि एक क्रेडिट कार्ड ताब्यात घेऊन एटीएमचे पिन मिळवले व खात्यातील पैसे काढले. इतकेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादीच्या नावावर 11 लाख 61 हजार रुपयांचे ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेतले आणि त्यापैकी 3 लाख 90 हजार रुपये काढून खर्च केल्याचे तपासात उघड झाले.
या घटनेनंतर कर्जत पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून 10 मार्च रोजी आदिती रमेश ढोके आणि सुशील देवराम जाधव यांना अटक केली. त्यांना कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान हा सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सहेड, महिला सहायक पोलीस निरीक्षक मनिषा लटपटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक तसेच पोलीस कर्मचारी सागर शेवते, ए.एम. वडते, स्वप्नील येरूणकर, समीर भोईर, सौरभ पाटील, स्वाती मसगुडे, केशव नागरगोजे, एस.एन. घोलप, विठ्ठल घावस, योगेश गर्जे, चंद्रकांत रावते यांच्या पथकाने केली.






