| तळा | प्रतिनिधी |
तळा शहर व परिसरातील वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते राकेश कासार यांनी महावितरणच्या उपअभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवण्यात आली आहे. तसेच, रोहा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडेही लेखी तक्रार देऊन लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राकेश कासार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळा शहर आणि परिसरातील वीजपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. अचानक वीज खंडित होणे, दुरुस्तीची कामे वेळेत न होणे तसेच तक्रारींवर उशिरा प्रतिसाद मिळणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे उपअभियंता श्री. घेवारेंनी मुख्यालयी राहणे आवश्यक असतानाही ते मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपअभियंता मुख्यालयी नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, एखादा ग्राहक महावितरणच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई केली जाते. मात्र, जुलै 2024 मध्ये तळा तालुक्यात महावितरण उपकार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेले घेवारें हे मुख्यालयी न राहता माणगाव येथे राहत असून शासनाचा निवासी भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.







