| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील डाऊन नगर येथे आदिवासी महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था, उरण, शिवराज युवा प्रतिष्ठान आणि शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनेटरी नॅपकिनचा योग्य वापर तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने यांनी दिली.
कार्यक्रमावेळी उपस्थित आदिवासी महिलांना डाबर कंपनीच्या वतीने शाम्पू, ज्यूस व सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यतेच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे यांनी देखील महिलांना बचत गट कसे स्थापन करावे याबाबत मार्गदर्शन व त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आई माऊली ग्राम संघाच्या अध्यक्ष अनु पाटील यांनी देखील बचत गटाची माहिती देऊन स्वतः त्या महिलांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.







