मंत्री आदिती तटकरेंची प्रमुख उपस्थिती
| तळा | प्रतिनिधी |
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते तळा शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले. शहरातील मेट मोहल्ला व वडाची वाडी येथे हायमास्ट दिवे बसविण्यात येणार असून, त्याचे भूमीपूजन तसेच वडाची वाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमीपूजन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले.
दरम्यान, बोरघर हवेली येथे असलेल्या तालुका क्रीडा संकुल तळा येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली अद्ययावत अशी व्यायामशाळा व क्रीडा साहित्यांचा लोकार्पण सोहळादेखील मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी तळा पंचायत समिती सभापती नथुराम मुकण, उपसभापती रवि मांडवकर, जिल्हा परिषद सदस्या गीता जाधव, तालुका अध्यक्ष नाना भौड, महिला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







