भोंदूगिरीतून कमावलेले कोट्यवधी शिरढोणच्या जमिनीत?
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
भोंदूगिरीच्या जोरावर कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप असलेला ‘कॅप्टन’ अशोक खरात आता गंभीर अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच्या कथित आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे थेट पनवेल तालुक्यातील शिरढोण गावापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गडद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयास्पद निधी सुरक्षित ठेवण्यासाठी शिरढोणमधील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. मात्र, हा सगळा व्यवहार सरळ मार्गाने न होता ‘बेनामी’ पद्धतीने, म्हणजेच नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता उभी करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सातबारा नोंदीतूनही या व्यवहारांचे धागेदोरे मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार काही दिवसांत पूर्ण झाले. सामान्य नागरिकांना छोट्या कामासाठी महिनोनमहिने सरकारी दारात हेलपाटे मारावे लागतात, पण इथे मात्र मोठे व्यवहार ‘फास्ट ट्रॅक’वर कसे गेले? हा प्रश्न आता थेट महसूल यंत्रणेकडे रोखला जात आहे. सूत्रांच्या मते, नियमांना बगल देत काही अधिकाऱ्यांनी या व्यवहारांना ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ खरातच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या रडारवर आली आहे. पनवेल परिसरातील वाढत्या रिअल इस्टेट दरांचा फायदा घेत काळा पैसा जमिनीत वळवण्यात आल्याचा संशय अधिक बळावत असून, या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची साखळी, निधीचा उगम आणि अधिकाऱ्यांची भूमिका याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे शिरढोणसह पनवेल परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, येत्या काळात आणखी मोठे ‘बॉम्ब’ फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूलच्या अधिकाऱ्यांची नियमांना बगल
या जमिनी थेट त्याच्या नावावर न घेता नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचे समोर आले असून, संबंधित सातबारा नोंदीतही त्याची नोंद असल्याची माहिती आहे. या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून, या निधीचा स्रोत संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे व्यवहार अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देत या प्रक्रियेला मदत केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.







