डॉ. रागिणी नायक यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
| नेरळ | प्रतिनिधी |
काँग्रेस पक्षाला पुन्हा सक्षम करण्यासाठी नेहरू-गांधी यांच्या विचारांची गरज असून प्रतिकूल परिस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या यांनी केले. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
प्रदेश काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नेरळ येथील साने हॉलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव, मनीष गणगोरे, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, मिलिंद पाडगावकर, विवेक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नाना म्हात्रे, माजी उपसभापती अरविंद पाटील, डॉ. सदावर्ते, मंदा सोनटक्के आदी कार्यकर्तेही उपस्थित होते.
डॉ. रागिणी नायक यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पंतप्रधानांच्या ’56 इंच छाती’ या विधानाचा उल्लेख केला. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटले की, ‘चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करत असताना ठोस भूमिका दिसत नाही. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक भूमिका घेत देशाची ताकद दाखवून दिली होती. आज तशी भूमिका अपेक्षित आहे.’
पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. आज संघटना पुन्हा उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश सरचिटणीस मनीष गणगोरे यांनी सांगितले की, ‘1999 पूर्वी काँग्रेसची ताकद जिल्ह्यात मोठी होती. नंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्ष कमजोर झाला. मात्र ‘संघटन सृजन अभियान’मुळे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होऊन पक्षाशी जोडले जातील.’
तर तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी कर्जत तालुक्याची परिस्थिती मांडताना सांगितले की, हा आदिवासी बहुल तालुका असून येथे उद्योगधंदे कमी आहेत. इतर पक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत आणि विरोधकांना सामोरे जात आहेत. बैठकीत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी संघटन वाढ, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर भर देण्यात आला.
मात्र कार्यकर्ते अजूनही ठाम : महेंद्र घरत
रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पक्षाच्या स्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कर्जत तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी झाली. अनेक वर्षे सत्तेत असूनही स्थानिक कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आजही तालुक्यातील कार्यकर्ते पक्षाचा झेंडा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.'






