वनविभाग, नगरपरिषदेची संयुक्त मोहीम; अतिक्रमण हटवल्याने पर्यटनाला नवी दिशा
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
दीर्घकाळ अतिक्रमणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर अखेर मोठी दिलासादायक कारवाई करण्यात आली आहे. वाढत्या टपऱ्या, हातगाड्या आणि अनधिकृत व्यवसायांमुळे किनाऱ्याचे सौंदर्य झाकोळले गेले होते. मात्र, वनविभाग आणि नगरपरिषदेच्या संयुक्त कारवाईमुळे हा किनारा पुन्हा एकदा स्वच्छ, मोकळा आणि आकर्षक बनला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक, पर्यटक आणि ‘कृषीवल’च्या माध्यमातून अतिक्रमणाविरोधात सातत्याने आवाज उठवला जात होता. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर सखोल चर्चा झाली. स्थानिकांना प्राधान्य देत टपरीधारकांना शिस्त लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले. वनविभागाने संबंधित टपरीधारकांना नोटिसा बजावून अनधिकृत टपऱ्या हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले. प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे अनेक टपरीधारकांनी कोणतीही कारवाई होण्याआधीच स्वतःहून आपल्या टपऱ्या व हातगाड्या हटवल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दूर झाले आणि किनाऱ्याला अक्षरशः ‘मोकळा श्वास’ मिळाला.
या कारवाईनंतर समुद्रकिनाऱ्यावर मोकळी जागा उपलब्ध झाल्याने पर्यटकांसाठी अनेक सुविधा सहज उपलब्ध झाल्या आहेत. फेरफटका मारण्यासाठी प्रशस्त जागा, वाहन पार्किंगची सुधारलेली व्यवस्था व स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक सुखद होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील हॉटेल्स, लॉज आणि भोजनालयांमध्ये पर्यटकांची संख्या वाढत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा फायदा होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले असले, तरी ही मोहीम तात्पुरती न राहता कायमस्वरूपी असावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित तपासणी, कठोर कायदेशीर कारवाई आणि स्पष्ट नियमावली आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.







