| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहर विकासासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याची महत्त्वपूर्ण मागणी नगरसेविका ॲड. शिवानी घरत यांनी महासभेत मांडली. महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाशी संबंधित असलेल्या या विषयामुळे सभागृहात सकारात्मक चर्चा रंगली.
यावेळी बोलताना नगरसेविका ॲड. शिवानी घरत यांनी महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी अधोरेखित केल्या. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक शारीरिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी अचानक अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यास महिलांना मोठी गैरसोय सहन करावी लागते, असे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध नसल्यामुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. ही केवळ सुविधा नसून महिलांच्या सन्मानाशी आणि मूलभूत गरजांशी संबंधित बाब आहे, असे स्पष्ट करत त्यांनी महापालिकेने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, या विषयावर सभागृहातील अनेक सदस्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत महिलांसाठी अशा मूलभूत सुविधांची गरज अधोरेखित केली. त्यामुळे लवकरच या प्रस्तावावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







