रा.जि.पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेंकडे तक्रार
| नागोठणे | प्रतिनिधी |
उष्णतेचा दाह अधिकाधिक तीव्र होत असतानाच नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायतीमधील आंबेघर येथील महिला व ग्रामस्थ गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा आंबेघर ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमलेल्या ग्रामस्थांतर्फे माजी उपसरपंच रंजना माळी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रिलायन्स कंपनीकडून वार्षिक दीड कोटी रुपये कर मिळणाऱ्या या ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपये जमा असतांनाही निर्माण झालेल्या पाणी टंचाई संदर्भात तसेच ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक व गटविकास अधिकारी यांच्याविषयी तक्रार करून याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायती मधील सरपंच व सदस्यांची मुदत दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून, शांतेश जुजगार हे येथे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंबेघर गावातील पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून गावातील पंप हाऊस मध्ये 15 अश्वशक्तीचा पाण्याचा पंप बसवून पंप हाऊस पासून साठवण टाकीपर्यंत 4 इंच व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा ठराव 15 ऑगस्ट, 2025 च्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या व महिलांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.
मात्र, सात महिने उलटूनही या कामाचे साधे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले नाही. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही उपायोजना न केल्याने अखेर 12 मार्च, 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी ग्रामस्थांजवळ चर्चा केली होती. त्यानंतर आपण लवकरच यावर उपाययोजना करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावण्याचा आपल्या भूमिकेस तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर आजतागायत पाण्याविषयी कोणतीही उपाययोजना न झाल्याने शेवटी पुन्हा एकदा आंबेघर ग्रामस्थ व महिलांचा भडका उडाला आहे.
त्यानुसार आंबेघर गावातील महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.7) सकाळी 11 वाजता पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे हे प्रकृती अस्वस्थेमुळे रजेवर असल्याचे आणि प्रशासक शांतेश जुजगार हे कार्यालयात न येता त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे उपस्थित महिला व ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी आंबेघर मधील गंगाराम मिणमिणे, बळीराम बडे, माजी उपसरपंच काळुराम माळी, माजी उपसरपंच रंजना माळी, विठोबा माळी, देवराम घासे, नामदेव घासे वृषाली माळी, पूनम डाकी, सुषमा घासे, प्रमिला घासे, पिंकी डाकी, शालिनी बडे आदींसह आंबेघर मधील अनेक ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान मुख्य जलवाहिनीमधून घेण्यात आलेले अनेक अनधिकृत जोडण्या, स्वतःच्या व्यवसायासाठी चोरले जाणारे पाणी यामुळेच आंबेघर गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सद्यस्थितीत अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून, स्नान व इतर विधी तसेच कपडे धुण्यासाठी कोणते पाणे वापरायचे हा गहन प्रश्न ग्रामस्थ, विशेषकरून महिलांसमोर उभा राहिला आहे.
यासंदर्भात राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्याशी संपर्क साधला असता आंबेघर गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ योग्य त्या सूचना देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. तर ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे यांनी सांगितले की, सर्व अनधिकृत जोडण्या काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आल्या असून पाणी सुरळीत ठेवण्यासाठी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्याने कामाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. तसेच नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक बनविण्यासाठी रोहा पंचायत समितीच्या उप अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे विजय अहिरे यांनी स्पष्ट केले.




