| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या परिसरालगत असलेल्या आदिवासी पाड्यावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान पाड्यातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली. मंत्री उईके यांनी या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत तात्काळ संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. लवकरात लवकर कामे पूर्ण करून पाड्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.






