| निंगबो | वृत्तसंस्था |
भारतीय खेळाडूंना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील बुधवारी संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे एच. एस. प्रणोय, आयुष शेट्टी व पी. व्ही. सिंधू यांनी एकेरी गटात विजय मिळवत पुढे पाऊल टाकले असताना दुसरीकडे मात्र लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, तन्वी शर्मा, मालविक बनसोड या खेळाडूंना एकेरी गटातच पराभवाचा सामना करावा लागला. पी. व्ही. सिंधू हिने विजयी वाटचाल केली असतानाच तन्वी शर्मा व मालविका बनसोड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पी. व्ही. सिंधू हिने वोंग चिंग हिला 15-21, 21-11, 21-19 असे नमवले. पहिला गेम पराभूत झाल्यानंतर पी. व्ही. सिंधू हिने पुढील दोन गेममध्ये झोकात पुनरागमन केले. भारताच्या फुलराणी हिने एक तास व सात मिनिटांत विजय संपादन केला.







