पनवेलमध्ये कंत्राटी सफाई कामगारांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे समान वेतन, भत्ते आणि सुविधा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. आझाद कामगार संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनामुळे प्रशासनावर निर्णय घेण्याचा दबाव वाढला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रस्ते, उपरस्ते, बाजारपेठा, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते. या कामात कंत्राटी सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. दररोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत झाडू मारणे, कचरा उचलणे, गटारांची साफसफाई अशी कठीण कामे हे कामगार सातत्याने करतात. कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांकडून एकाच प्रकारचे काम करून घेतले जात असतानाही वेतनात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. कायम कामगारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन, भत्ते व सुविधा मिळतात, तर कंत्राटी कामगारांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे.
महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम 1971 तसेच न्यायालयीन निर्णयांनुसार “समान काम, समान वेतन” हे तत्त्व लागू करणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत याची अंमलबजावणी झाल्याचा दाखला देत पनवेलमध्येही तत्सम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, मागील काही वर्षांतील वेतनातील फरकाची थकबाकी देण्याचाही मुद्दा ऐरणीवर आहे. वाढती महागाई, शिक्षण व आरोग्य खर्च यामुळे कंत्राटी कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
कामगारांची व्यथा
आम्ही शहर स्वच्छ ठेवतो, पण आमचे जीवन मात्र अस्वच्छ आणि असुरक्षित आहे, अशी भावना अनेक कंत्राटी सफाई कामगारांनी व्यक्त केली.
संघटनेचा इशारा
आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, समान कामासाठी समान वेतन हा आमचा हक्क आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.







