नोव्हेंबर 2025 पासून मानधनासाठी पाठपुरावा; सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना निवेदन
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी विशेषज्ञ डॉक्टरांचे मानधन अनेक महिन्यांपासून थकित असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या 17 एप्रिल 2026 पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संबंधित डॉक्टरांनी दिला आहे.
भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोगतज्ञ तसेच फिजिशियन अशा विविध विशेषज्ञ शाखांतील डॉक्टर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पूर्णवेळ सेवा बजावत आहेत. मात्र, नोव्हेंबर 2025 पासून त्यांचे मानधन प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ते मिळालेले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकदा प्रयत्न करूनही थकीत मानधनाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. काही डॉक्टरांचे तर ऑगस्ट 2025 पासून मानधन थकलेले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे डॉक्टर आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या मनोबलावरही परिणाम होत आहे. या संदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना निवेदन देत संबंधित डॉक्टरांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ मानधन अदा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, नाईलाजास्तव सर्व विशेषज्ञ डॉक्टरांना कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तो सोडवावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
रुग्णांना बसणार आंदोलनाचा फटका
संभाव्य आंदोलनाचा सर्वाधिक फटका माणगाव व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. आधीच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मर्यादित असताना, विशेषज्ञ डॉक्टरांनी काम बंद केल्यास रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या निवेदनावर विविध विशेषज्ञ डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी एकमुखाने आपल्या हक्काच्या मानधनासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.







