एका प्रकरणी गुन्हा दाखल
| रायगड | प्रतिनिधी |
बालविवाह या प्रथेला आळा घालण्यासाठी रोहा पोलिसांनी मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. यापैकी एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत गायचोळे आदिवासीवाडी येथे 16 मार्च रोजी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच वाडीतील 20 वर्षीय तरुणासोबत होणार होता. यासंदर्भात पोलीस मंगल टेमकर यांना लग्नपत्रिकेसह गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ प्रभारी अधिकारी मारुती पाटील यांना कळवले. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबीयांना ताब्यात घेऊन बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत कायद्याची माहिती देत त्यांचे समुपदेशन केले. दुसऱ्या प्रकरणात, मे 2026 मध्ये गायचोळे आदिवासीवाडीतील 17 वर्षीय मुलीचा विवाह कोलाड येथील 20 वर्षीय तरुणासोबत ठरवण्यात आला होता.
याबाबत बीट अंमलदार नरेश मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिकारी सुयशकुमार सिंह यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक, ग्रामसेवक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधितांना समज देण्यात आली.तर, भुवनेश्वर आदिवासीवाडी येथे 28 जून 2025 रोजी बालविवाह असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना समज देण्यात आली होती, परंतु त्यानंतरही विवाहाची तयारी सुरूच होती.
यादरम्यान हळदी समारंभात पोलिसांनी छापा टाकला असता 16 वर्षीय मुलीशी संबंधित तरुणाने संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित मुलगा व दोन्ही कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोषारोपपत्रदेखील न्यायालयात सादर केले आहे.






