| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील गोखले शाळेकडून शिल्प चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता गेल्या काही दिवसांपासून सतत कोंडीच्या विळख्यात सापडत होता. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदा पार्किंगमुळे रस्ता व्यापणाऱ्या तब्बल 80 वाहनांवर पोलिसांनी ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली असून, काही वाहने थेट उचलून नेली आहेत.
खारघर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी भरत थिटे यांनी गोखले शाळेकडून शिल्प चौकाकडे जाणारा रस्ता हा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, शाळा, निवासी वसाहती आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनचालक बेकायदा पार्किंग करत असल्याने कोंडी होत होती. यामुळे पादचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत खारघर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. दरम्यान, वाहतूक विभागाने वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.







