पिकअप टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील पालव फाट्याजवळ वळणावर भरधाव पिकअप टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 14) रात्री सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील जयवंत कवळे (34) रा. नागाव व सर्वेश सुभाष पाटील (27) रा. वरंडे हे दोघे स्प्लेंडर मोटारसायकलवरून नागावकडून रेवदंडा दिशेने जात होते. बागमळा परिसरात पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पालव फाट्याच्या पुढील वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पोने भरधाव वेगात व निष्काळजीपणे राँग साईडने येत मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोटारसायकलवरील दोघे खाली पडले. स्वप्नील कवळे यांना उजव्या पायाला दुखापत झाली असून, सर्वेश पाटील यांना उजव्या हात व मांडीला दुखापत झाली आहे. अपघातात पिकअप टेम्पो चालक किशोर काशिनाथ पाटील (45) रा. सातपूर, नाशिक यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस अधिकारी आर. के. थळे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.







