| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र किनारपट्टीवर एप्रिलच्या मध्यापासून पडलेल्या उष्णतेच्या लाटेने अलिबाग तालुक्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर शांतता पसरली आहे. याठिकाणचे तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पर्यटकांनी अलिबागसह रेवदंडा समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात स्थानिक रिसॉर्ट आणि हॉटेल व्यावसायिकांच्या खिशाला चापट बसली असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या पर्यटन हंगाम सुरू असून अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळावर दररोज शेकडो पर्यटक येत असतात. यंदा एप्रिलच्या मध्यापासून किनारपट्टीवर तापमान कमाल 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असायची. आता मात्र दुपारच्या वेळी एकही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फिरकताना दिसत नाही. जे येतात ते क्षणभर थांबून माघारी परतात. उष्णतेमुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्याने रेवदंड्यातील 20हून अधिक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सला मोठा फटका बसत आहे. अचानक बुकिंग देखील रद्द होत आहेत. त्यामुळे उत्पन्न 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे स्थानिक रिसॉर्ट मालकांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक रिसॉर्ट्समध्ये एसी, पूल किंवा सावलीदार जागांची पुरेशी व्यवस्था नसल्याने देखील पर्यटक दुसरीकडे जात आहेत. उन्हाळ्यात पर्यटन हा आमचा मुख्य व्यवसाय, आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल? असा प्रश्न व्यावसायिकांधून विचारला जात आहे.
नियोजनाचा अभाव
रेवदंडासारख्या पर्यटनप्रधान गावात हा व्यवसाय थांबला असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे. सुज्ञ नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, व्यावसायिकांनी उन्हाळी हंगामासाठी पूर्वतयारी करायला हवी होती. आता स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. त्यामुळे हॉटेल कर्मचारी, दुकानदार आणि गाडी व्यवसायालाही फटका बसला आहे. व्यावसायिकांनी आता पावसाळ्यापर्यंत टिकण्यासाठी नवीन योजना आखण्याची गरज आहे. पर्यटकांसाठी थंडगार वातावरण निर्माण करणाऱ्या सुविधा वाढवाव्यात, त्यात सावलीदार कॉटेज/रिसॉर्ट्र्स, इंडोर गेम्स किंवा थंड पेयांचे स्टॉल उभारण्याचा सल्ला पर्यटन तज्ज्ञांनी दिला आहे.






