शहराच्या विविध भागांत लावले वाहतूक नियमांचे फलक
। नेरळ । प्रतिनिधी ।
वाहतुकीचे नियम हे दंडात्मक कारवाईसाठी नाहीत तर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी केले. त्याचाच एक भाग म्हणून या भागातील निलेश डेकोरेटर्स यांच्याकडून नेरळ पोलीस ठाण्यासाठी वाहतूक नियमांची नियमावली असलेले फलक बनवून दिले.
रायगड पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती मोहीम आणि नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई सुरू आहे. नेरळ आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस आणि नेरळ पोलीस ठाण्यामार्फत एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांना रहदारीचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहेत. नेरळ परिसरातील वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती मिळावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमात नेरळ भागातील मनिलेश डेकोरेटर्सचे निलेश भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत.
या मोहिमेबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी वाहतुकीचे नियम हे दंडात्मक कारवाईसाठी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हिताच्या आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग करणे किंवा नियमबाह्य पार्किंग केल्याने स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्यांनी तरुणांना आणि चारचाकी वाहनचालकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.







