टोरंटमुळे सह्याद्री रांगेला धोका; रहिवाशांवर उपासमारीची वेळ
| नेरळ | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या डोंगररांगा तेथील जैवविविधता आणि निसर्गसंपदा यासाठी ओळखला जातो. याच सह्याद्री पर्वत रांगेतील महत्वाच्या असलेल्या बोरघाटाच्या अवतीभवती टोरंटकडून जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प जैवविविधता धोक्यात आणणारा असून पर्यावरण मंत्रालयाने सह्याद्री पर्वत रांगा उद्ध्वस्त करण्यासाठी या प्रकल्पाला मान्यता दिली आहे का? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपस्थित केला आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसंपदा तसेच तिथे राहणारा स्थानिक समाज आज एका मोठ्या संकटाच्या छायेत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली आणि साई डोंगर भागात टोरंट पॉवर या कंपनीचा 3000 मेगावॅट क्षमतेचा पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट येऊ घातला आहे. परंतु, हा प्रकल्प स्थानिकांच्या अस्तित्वावर आणणारा ठरत आहे. या प्रकल्पाबाबत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. ग्रामसभेला विश्वासात न घेता, पर्यावरणाचे दाखले मिळवण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याचे ग्रामस्थ आरोप करीत आहेत. हा प्रकल्प येथील पेज नदीवर होत आहे. त्यामुळे येथील संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली आहे. सह्याद्रीच्या कुशीत आधीच टाटा समूह प्रकल्प उभारत असून, तेथे आणखी एका मोठ्या प्रकल्पाची भर टाकल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची भीती वर्तविली जात आहे.
या टोरंट प्रकल्पामुळे येथील निसर्ग आणि वन्यजीवांचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. या जलविद्युत प्रकल्पांमुळे भूस्खलन आणि भूकंप होऊ शकतात.सह्याद्रीच्या या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग आणि डोंगर पोखरण्याचे काम चालणार आहे. त्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढणार असून, कोयना धरणासारख्या मानवनिर्मित भूकंपांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली जात आहे. वन्यजीव यांनी नटलेला असा हा भाग भीमाशंकर ते संजय गांधी नॅशनल पार्क यांमधील बिबट्यांच्या स्थलांतराचा महत्त्वाचा मार्ग आहे. प्रकल्पाच्या बांधकामामुळे हा मार्ग खंडित होऊन मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढू शकतो.
प्रामुख्याने या भागात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आणि माशांच्या प्रजाती आहेत, ज्या या प्रकल्पामुळे नष्ट होतील. त्यामुळे येथील आदिवासी, धनगर समाज आणि कातकरी जमात यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. धनगर समाजाचे लोक पिढ्यानपिढ्या या जंगलावर अवलंबून आहेत. लाकूडफाटा, रानभाज्या, औषधी वनस्पती आणि मासेमारी यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.सह्याद्री हा केवळ डोंगर नाही, तर तो महाराष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे टोरंट पॉवरसारख्या प्रकल्पांची गरज खरोखरच आहे का? याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. निसर्गाचा बळी देऊन मिळवलेली वीज आपल्याला भविष्यात किती महाग पडेल, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. हे लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण टोरंटच्या विरोधात असल्याचे जाहीर केले आहे. प्रसंगी कर्जतमध्ये येऊन आंदोलन करू, असे आव्हान आणि इशारा देखील सरकारला दिला आहे.







