| माथेरान | प्रतिनिधी |
पर्यटन हंगाम आलेला असताना अद्यापही माथेरान वासीयांना पाण्याच्या जटील समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने माथेरानकर आक्रमक झालेले दिसत आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांसह विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, वसंत कदम, सीताराम शिंदे, सागर जोशी, अतिष ढेबे यांनी थेट जल शुद्धीकरण केंद्रावर जाऊन धडक दिली.
नेरळ उल्हास नदीतून पाण्याचा उपसा केला जात आहे. या ठिकणी एकूण 3 पंप बसविण्यात आले असून, नदीतनू 24 तास पाणी काढले जात आहे. जुम्मापट्टी येथे 16 तास पंपिंग होत असतानाही इथे फक्त दहा तास का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन दिवस माथेरानमध्ये फक्त 8 तास पंपिंग केली आहे. माथेरान लेकची पंपिंग बंद असून, 32 फूट पाणीसाठा शिल्लक असून या तलावाची तीन ते चार वर्षे स्वच्छता न केल्यामुळे 15 फूट गाळ साचला आहे. फिल्टर हाऊसला सफेद रेती संपल्याने पाणी फिल्टर प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होत असून नागरिकांना दुषित पाणी मिळत आहे. त्यातच नेरळहुन पाण्याचा उपसा होताना वाटेत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे जोडण्या केलेल्या दिसत आहेत.
एकीकडे ग्रामस्थांनी पाण्याची बिले अदा करायची आणि दुसरीकडे पाण्याची चोरी सुध्दा केली जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे नागरिक बोलत आहेत. 2021 ते 2025 या वर्षापर्यंत पंधरा तास पंपिंग केली जात होती ती सध्याच्या घडीला सहा ते सात तास पंपिंग होत असते. एका तासाला जेमतेम नव्वद हजार लिटर पाणी येत असून, संपूर्ण माथेरानमध्ये आजच्या परिस्थितीत अठरा लाख लिटर पाण्याची गरज असते.
पाण्याचे पंप सुध्दा नादुरुस्त असतात अशावेळी येथील शारलोट लेकमधून पाण्याचा उपसा केला जात असतो. या लेकची पातळी खालावल्याने गाळ वजा करता वीस फूट पाण्याची पातळी शिल्लक आहे. यामुळे गावातील विविध ठिकाणी हप्त्यातून एक दिवस पाणी कपात केली जात आहे.







