जनावरांचे आरोग्य धोक्यात
| खोपोली | प्रतिनीधी |
गारमाळ येथे असलेल्या हिरानंदानी यांची ग्रीन फिल्ड ही कंपनी कचरा माळरानावर टाकत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाटमाथ्यावर गारमाळ येथे हिरानंदानी यांची ग्रीन फिल्ड कंपनी असून, येथे त्यांच्या जागेमध्ये बंगले बांधले आहे. मात्र, या सर्व बंगल्यामधील आणि हिरानंदानी कंपन्यांचा घणकचरा हे माळरानावर उघड्यावर टाकत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा येथे टाकत असल्याने येथील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे हा कचरा खाऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तर काही जनावरे दगावली आहेत, तर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्याचाही समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून गारमाळ येथे हिरानंदानी यांचा मोठा प्रकल्प येथे असून, येथे अनेकांचे बंगले बांधण्याचे काम सुरु आहे. तर काही धनधाडग्यांचे बंगले तयार आहेत. त्यामुळे या सर्व बंगल्यामधील घन कचरा कंपनी गोळा करून माळरानावर टाकत असल्याचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून येथे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून. येथील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कंपनीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून येथे असून स्थानिकांना नाहक त्रास देत आहेत. या कंपनीतील बंगल्यामधील कचरा माळरानावर टाकत आहे. या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
दत्तात्रय शेडगे
माजी सदस्य







