| रसायनी | प्रतिनिधी |
जुना मुंबई-पुणे रस्त्यावर एका बंगल्याला बांधण्यात आलेल्या शेडवरील पत्रे शनिवार (दि.9) सायंकाळी अचानक आलेल्या धुळीचे लोट, पाऊस आणि जोरदार वाऱ्याने उडून ते महामार्गावर पसरले होते. त्यामुळे हा महामार्ग पुर्णपणे बंद झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या धुळीचे लोट तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान केले असून याचा फटका मुंबई-पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडीत झाला. येथे बन्सल नावाचा मोठा बंगला असून, या बंगल्याला पूर्ण झाकून ठेवण्यासाठी प्रचंड मोठी पत्र्याची शेड उभी केली आहे. या शेडचे बांधकाम करताना स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची परवानगी घेण्यात आली असल्याची माहिती कुणालाच नव्हती. या शेडचे पत्रे उडून काही किमी अंतरावर माळरानावर विखुरले. हे धारदार पत्रे उडताना त्यांनी नारळाची, सुपारीचे असलेली झाडे कापून काढली, तर वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत् खांब व वाहिन्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच, विद्युत खांब वर देखील पत्रा अडकून बसला आहे. त्यामुळे विद्युत खांब वाकले आणि विद्युत वाहिन्या खाली आल्या आहेत. त्यातच पत्रे रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली होती. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते रामदास काईनकर यांनी तातडीने आयआरबी या रस्ता देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांना व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना कळविले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या झाडांना व पत्र्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी विखुरलेले पत्रे जमा करण्याचे आदेश दिले. या बेकायदेशीर शेडवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.







