पोयनाड पोलिसांची तत्पर कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह पोयनाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला. पोलीस पाटील परशुराम पाटील यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असतानाच पोलिसांनी नवरा-नवरीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता नवऱ्या मुलाचे विवाहासाठी आवश्यक कायदेशीर वय पूर्ण नसल्याचे उघड झाले.
पोलीस निरीक्षक आर.जी. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत समुपदेशन केले. अल्पवयीन मुलाचा विवाह केल्यास कायदेशीर कारवाई आणि भविष्यातील गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, याची जाणीव करून दिल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी होणारे लग्न तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणात पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ओ.पी. घरत आणि महिला पोलीस शिपाई पी.व्ही. घरत यांनी तातडीने कारवाई करत बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलाचे बालविवाहापासून संरक्षण झाले असून, परिसरात पोयनाड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.





