| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील घणसोली सेक्टर-7 परिसरातील सिम्प्लेक्स प्रकल्पामधील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयाने रबाळे पोलीस ठाण्याकडे अधिकृत तक्रार पाठवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. या कारवाईमुळे घणसोली परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, रहिवाशांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या पत्रानुसार, कै. अण्णासाहेब पाटील को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, तसेच घणसोली सेकक्टर 7 येथील ओम साईधाम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीकडून आवश्यक परवानग्या न घेता बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेकडून संबंधितांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याबाबत किंवा नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटीस दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे महापालिकेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता पुढील टप्प्यात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने रबाळे पोलीस ठाण्याकडे पाठविलेल्या पत्रासोबत पाहणी अहवाल, पंचनामा, नोटीसची प्रत आणि अन्य संबंधित कागदपत्रे जोडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात पुरावे गोळा करूनच पुढील कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.







