| रत्नागिरी | प्रतिनिधी |
गणेशगुळे समुद्रकिनारा येथे इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा दुर्मिळ सागरी सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉल्फिनसदृश दिसणारा हा प्राणी समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर वाहून आला होता. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहताच संबंधित यंत्रणांना माहिती दिली. मात्र, हा सागरी जीव नेमका कशामुळे मृत्यूमुखी पडला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा प्राणी इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज या नावाने ओळखला जातो. स्थानिक भाषेत त्याला अनेकदा ‘डुकरा मासा’ किंवा डॉल्फिन समजले जाते. मात्र, इतर डॉल्फिनप्रमाणे त्याला लांब चोच नसते. गोलाकार डोके आणि पाठीवर कोणताही पर किंवा कल्ला नसणे, ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच त्याला ‘फिनलेस पॉरपॉईज’ असे नाव देण्यात आले आहे. साधारण दीड ते दोन मीटर लांबीचा हा सागरी सस्तन प्राणी प्रामुख्याने मासे आणि लहान समुद्री जीवांवर उपजीविका करतो.
हा जीव मुख्यतः हिंदी महासागर आणि पश्चिम पॅसिफिक महासागर परिसरात आढळतो. किनारी भागातील उथळ समुद्र, खाड्या आणि खारफुटीच्या परिसरात त्याचे वास्तव्य असते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढते समुद्री प्रदूषण, प्लास्टिक कचरा, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि किनारी अधिवास नष्ट होणे यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज ही अत्यंत संवेदनशील आणि संरक्षित प्रजाती मानली जाते.
गणेशगुळे किनाऱ्यावर आढळलेला मृत प्राणी कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सागरी जैवविविधतेच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा दुर्मिळ सागरी प्राण्यांचा मृत्यू हा केवळ एका जीवाचा अंत नसून, तो सागरी परिसंस्थेतील बिघाडाचा इशारा असू शकतो.
संशोधक आणि अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा किनारी परिसंस्थेच्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा सूचक मानला जातो. त्यांच्या उपस्थितीतून समुद्रातील जैवविविधता, खाड्या आणि खारफुटीच्या जंगलांची स्थिती समजते. प्रदूषण, अन्नसाखळीतील बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या प्राण्यांवर त्वरित दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे सागरी जीवसंपत्तीचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि किनारी परिसंस्थेच्या जतनाबाबत अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.







