गावाच्या वेशीवर उभारण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांकडून प्रखर विरोधाचा इशारा
| कर्जत | प्रतिनिधी |
कडाव ग्रामपंचायतीकडून माणकिवली गावाच्या वेशीवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती न देता हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
डंपिंग ग्राउंडसाठी प्रस्तावित जागा ही माणकिवली गावाच्या मुख्य रस्त्यालगत असून, या परिसरात आदिवासी विकास विभागाचे शासकीय बहुउद्देशीय केंद्र, आदिवासी वस्ती, लहान मुलांची अंगणवाडी तसेच ग्रामदैवत सातीचे देव यांचे स्थान आहे. गावातील नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी हा प्रमुख आणि एकमेव मार्ग असल्याने येथे दररोज शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याच परिसरासमोर स्मशानभूमी देखील असल्याने, भविष्यात येथे डंपिंग ग्राउंड उभारण्यात आल्यास दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात कचऱ्यामुळे दूषित पाणी तलाव आणि परिसरात पसरण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय धोका वाढू शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने स्पष्ट नियमावली निश्चित केली असून, डंपिंग ग्राउंड हे लोकवस्ती, शाळा, रुग्णालय, विहीर, नदी, तलाव आणि पाणवठ्यांपासून सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासनाची परवानगी, ग्रामसभेची मान्यता आणि पर्यावरणीय निकषांची पूर्तता बंधनकारक असते. परंतु, या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान, कडाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गावरान जमिनी गावाबाहेर उपलब्ध असताना लोकवस्तीच्या जवळच डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
माणकिवली ग्रामस्थ तसेच तलावाशेजारील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रस्तावित डंपिंग ग्राउंडला तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला असून, आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा विषय अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्व्हे नंबर 137/17 या जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण होऊ नये यासाठी लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डंपिंग ग्राउंड होणार नाही.
प्रेमसिंग गिरासे,
ग्रामसेवक, कडाव ग्रामपंचायत







