। पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तहसील कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून मंडळ अधिकारी गोवर्धन माने याला लाचेची तीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना पनवेल तक्का येथील मिठास स्वीट समोर रंगेहात ताब्यात घेतले. गावदेवीपाडा येथील उताऱ्यावर नाव नोंदीसाठी रकमेची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील दलाली आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या कारवाईनंतर पनवेलमधील नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कनिष्ठ कर्मचारी किंवा मंडळ अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच घेण्याचे धाडस करू शकत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “मंडळ अधिकारी गोवर्धन माने हा नक्की कोणासाठी पैसे गोळा करत होता?” हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. गोवर्धन माने हा केवळ एक ‘कलेक्टर’ (पैसे गोळा करणारा दुवा) असून, या लाचेच्या पैशांमधील हिस्सा वरिष्ठ तहसीलदारांना की अन्य कोणत्या बड्या अधिकाऱ्याला जाणार होता, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
पनवेल तहसील कार्यालयात यापूर्वीही लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सातबारा, जमिनीच्या नोंदी आणि इतर दाखल्यांसाठी महिनोनमहिने चकरा माराव्या लागतात. कामे वेळेत करून घेण्यासाठी अशा प्रकारे लाचेची मागणी केली जाते. लाचलूचपत विभागाने आता केवळ माने याच्या अटकेवर न थांबता, या रॅकेटच्या मुळाशी जाऊन मागील सर्व व्यवहारांची आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर रायगड-अलिबाग ‘एसीबी’च्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथकातील सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील आणि पोलीस शिपाई नवदित नांदगांवकर यांनी ही कामगिरी बजावली.






