| मंचर | प्रतिनिधी |
आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी-अवसरी खुर्द येथील विधी भोर (13) हिने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिने धामणतर जेट्टी ते अटल सेतू हे तब्बल 42 किलोमीटर अंतर अवघ्या 7 तास 32 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विधीला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान निशांत भगत यांच्या हस्ते प्रदान केला. विधीला लहानपणापासूनच जलतरणाची विशेष आवड असून ती सध्या मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास आहे. सोमवारी पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी विधीने खाडीतून आपल्या जलतरण मोहिमेला सुरुवात केली. अथक प्रयत्न आणि जिद्दीच्या बळावर तिने अटल सेतू परिसरात ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.







