रुग्णावर ताटकळत राहण्याची वेळ; नातेवाईकांमधून संताप व्यक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील खांदण गावातील एका व्यक्तिला बुधवारी (दि.20) विषबाधा झाली. ही घटना घडताच त्यांना सायंकाळी 6.00 वाजता कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले. परंतु, विषबाधा जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्या रूग्णाला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलवण्यास सांगितले. त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास 108 ची रुग्णवाहिका मिळावी म्हणून संपर्क करण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका लवकरच पोहचेल, असे सांगण्यात आले. परंतु, एक तास होऊन देखील रूग्णवाहिका आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा 108 ला कॉल केला. त्यावेळी रूग्णवाहिका चालकाने, मी अलिबाग वरून आलो आहे, त्यामुळे तात्काळ येऊ शकणार नाही. मला रूग्णवाहिका घेऊन हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे किमान रात्री साडेआठ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचेन, अशी उत्तर देऊन कॉल कट केला. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती ढासळली. त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना रुग्णवाहिकेबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांच्याकडून देखील काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाची स्थिती पाहून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या दरम्यान, सरकारच्या अधिपत्याखाली चालवली जाणारी 108 नंबरची रूग्णवाहिका रूग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. तसेच, रुग्णाच्या जीवाचे काही बरं वाईट झाले तर याची जबाबदारी 108 रूग्णवाहिका घेणार का? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील डॉ. बाबासो कालेल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून तात्काळ रूग्णवाहिकेची सोय करण्यात आली. परंतु, रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास तीन तासांचा वेळ लागल्याने कशेळे ग्रामीण रुग्णालयात रूग्णवाहिके बद्दल निर्माण झालेला प्रश्न पुन्हा समोर आला आहे. कशेळे परिसर आदिवासी बहुल असून, गोरगरिबांच्या उपचाराची सोय या ग्रामिण हॉस्पिटलमध्ये होत असते. परंतु, रूग्णाला पुढील उपचारासाठी इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्यात सांगितल्यानंतर अनेक वेळा रूग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांची होणारी ही गैरसोय कधी संपणार? आणि नवीन रुग्णवाहिका कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.







