बंदरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली
| चिरनेर | प्रतिनिधी |
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुक आणि मे महिन्याच्या सुट्टीवर गेलेल्या सुमारे साडेचार हजार टीटी वाहनचालक परतलेच नसल्याने जेएनपीएची कंटेनर वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. बंदरात अडकून पडलेल्या सुमारे 25000 कंटेनर आयात निर्यात कंटेनरची वेळेत हाताळणी, वाहतूक करण्यासाठी आता जेएनपीएने परराज्यात गेलेल्या टीटी वाहनचालकांना बंदरात आणण्यासाठी रेल्वे गाड्या बुकिंग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी 50 लाखांहून अधिक खर्चाची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळताच जेएनपीएचे कंटेनर हाताळणीचे काम हळूहळू पुर्व पदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, याच दरम्यान पार पडलेल्या पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, केरळ, आसाम, पाँडीचेरी राज्याच्या निवडणुकीसाठी जेएनपीए बंदर व बंदर परिसरातील शेकडो विविध कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये (सीएफएस) काम करणारे सुमारे साडेचार हजार टीटी वाहनचालक सुट्टीवर गेले आहेत. तर, हजारो टीटी वाहनचालक हे महिन्यांची सुट्टी कुटुंबियांच्या सोबत व्यतीत करण्यासाठी आपापल्या राज्यातील गावाकडे गेले आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून परगावी गेलेले टीटी वाहनचालक परतलेच नाहीत. त्यामुळे जेएनपीए बंदरातील होणारी आयात निर्यात होणारी कंटेनरची वाहतूक पुरती कोलमडली आहे. हजारो कंटेनर बंदराबाहेरील सीएफएसपर्यत पोहचविण्यासाठी व सीएफएसमधुन बंदरात आणण्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुमारे 25000 हजार कंटेनर जेएनपीए बंदरात आणि परिसरातील विविध सीएफएसमध्ये अडकून पडले आहेत.
जेएनपीए बंदरातील उद्भवलेल्या कंटेनर वाहतूकीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी कंटेनर फ्रेट स्टेशन असोसिएशन ऑफ इंडिया व बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर्स असोसिएशनने जेएनपीएकडे केली होती. मात्र, जेएनपीएने टीटी वाहनचालकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित असोसिएशनचीच असल्याचे सांगत जेएनपीएने हात झटकले होते. मात्र, बंदरातील आणि सीएफएस दरम्यान कंटेनर वाहतूक अडचणीत आली आहे. त्यानंतर जेएनपीएनेच परराज्यात गेलेल्या टीटी वाहनचालकांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्समुळे जेएनपीए बंदराची वार्षिक कंटेनर हाताळणीची क्षमता 50 लाखांवरुन 1 कोटी 2 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बंदरावर कंटेनर वाहतूकीचा ताण वाढला आहे. त्यामध्ये नव्याने टीटी वाहनचालकांच्या तुटवड्याची भर पडली आहे. त्यामुळे बंदरात मागील काही दिवसांपासून जवळपास सुमारे 25000 कंटेनर अडकून पडले आहेत. परराज्यातुन टीटी वाहनचालकांना परत बंदरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही टीटी वाहनचालकांना रेल्वेची बुकिंग करून पश्चिम बंगालमधून माघारी आणण्यात आले आहेत. उर्वरित वाहनचालकांना रेल्वेने आणण्यासाठी जेएनपीएने 50 लाखांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात बंदरात अडकून पडलेल्या कंटेनरचा प्रश्न निकाली निघेल.
गिरीश थॉमस,
वरिष्ठ अधिकारी,
जेएनपीए कंटेनर वाहतूक विभाग







