। बीड । प्रतिनिधी ।
सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. ठिकठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात लग्न सोहळे सुरू आहे. अशातच बीडमध्ये लग्न सोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली. शहरातील एका भव्य विवाह सोहळ्यात कोल्ड फायर फटाक्याचा जमिनीवर स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच फोटोग्राफर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या फोटोग्राफरच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर ही बाब समोर आली असून, कार्यक्रमातील व्हिडिओ आणि ड्रोनमधील चित्रीकरणातूनही या दुर्घटनेचे धक्कादायक दृश्य समोर आले आहेत.
या दुर्घटनेत अभिषेक कदम या फोटोग्राफर्सच्या डोळ्यांसह चेहरा आणि शरीरही भाजले. यात पाच फोटोग्राफर्स जखमी झाले असले तरी अभिषेक कदम सर्वाधिक जखमी झाले. अभिषेकला संभाजीनगरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. अभिषेक याचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर आला होता. तोंडाला बँडेज बांधून त्याचा विवाह करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली.






