| रोहा | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल समिती धाटाव येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील खेळाडू व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये कबड्डी, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, कराटे, लाठीकाठी, उशू व मैदानी खेळ इत्यादी विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिले जात आहे. सकाळ व सायंकाळच्या सत्रांमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होत असून, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच खेळातील कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ व रोहा तालुका क्रीडा अधिकारी अंकित मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक रविंद्र कान्हेकर, राकेश पाटील, राकेश म्हसकर, अमित दळवी, विशाल गोवर्धने, रंजित रेवाळे, सिद्धी रेवाळे, कुणाल मालुंजकर, अमित घरत, श्रीकांत कांबळे, रोहन शेवाळे व धृती लाड हे काम पाहत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षणादरम्यान शिस्त, संघभावना आणि क्रीडा संस्कार यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले जात आहे. तालुका क्रीडा संकुल समितीच्यावतीने शिबिरासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आगामी काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.







