मातीचोर देवेंद्र कोणाच्या आशीर्वादाने मोकाट?
| उरण | प्रतिनिधी |
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर अवैध माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार करंजा परिसरात उघडकीस आला आहे. करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलच्या मागील बाजूस गेल्या आठ दिवसांपासून देवेंद्र नावाचा कथित मातीचोर शासकीय परवानगीशिवाय माती उत्खनन करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, सदर जागा शासकीय तसेच वन विभागाच्या अखत्यारित येत असून, द्रोणागिरी पर्वत परिसरात उत्खननास बंदी असतानाही जेसीबीच्या सहाय्याने सर्रासपणे पर्वताचे लचके तोडले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, द्रोणागिरी पर्वत हा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा मानला जातो. अशा संवेदनशील परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा मातीचोर नेमका कोणाच्या कृपाआशीर्वादाने एवढा बिनधास्तपणे माती चोरी करत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महसूल विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का? की शासकीय अधिकारी चिरीमिरी घेऊन गप्प बसणार? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.







