| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या श्रीवर्धन बस स्थानकाचा कारभार सध्या कमालीचा ढासळला आहे. श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसगाड्या वारंवार रस्त्यातच बंद पडणे, गाड्या सुटण्याच्या वेळेत होणारी प्रचंड अनियमितता आणि बसेसची वेळेवर न होणारी देखभाल यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत प्रवाशांच्या हक्कासाठी थेट प्रशासनाला जाब विचारला आहे.
मनसेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने बुधवारी (दि.27) श्रीवर्धन बस स्थानकाचे व्यवस्थापक मेहबूब मणेर यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक व लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मनसेचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष मृदास तोंडलेकर आणि माजी तालुकाध्यक्ष राजेश लोहार यांनी केले. या भेटीदरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकातील ढिसाळ नियोजनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “श्रीवर्धनमधून मुंबई, पुणे, ठाणे, नालासोपारा यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर अनेक गाड्या धावतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गाड्यांची योग्य देखभाल न केल्यामुळे त्या मध्येच बंद पडत आहेत. भर उन्हाळ्यात लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांना रस्त्यात ताटकळत राहावे लागत आहे. तसेच, वेळेवर गाड्या न सुटल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे,” याकडे शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले.
मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर श्रीवर्धन बस स्थानक व्यवस्थापक मेहबूब मणेर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची आम्ही गंभीर दखल घेत आहोत. गाड्यांचे मेन्टेनन्स आणि वेळेचे नियोजन अधिक चोख करण्यासाठी तांत्रिक विभागाला कडक सूचना दिल्या जातील. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि श्रीवर्धन बस स्थानकातून चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यास आमचे प्राधान्य राहील, असेही ते म्हणाले.







