शहरातून रोज हजारो टन कचरा जमा
| महाड | प्रतिनिधी |
महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचराडम्पिंग ग्राउंड डेपोला गुरुवारी (दि.28) सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीमुळे कचरा पूर्णपणे जळून नष्ट झाल्याने या परिसरातील गावांमध्ये धुरामुळे प्रदूषण झाले. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले. मात्र, कचरा डेपोतील कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने व मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग लागल्याने तसेच पावसाळा जवळ आल्याने या कचऱ्याचे करायचे काय यामुळे ही आग जाणीवपूर्वक लावली गेल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या कचरा डेपो बाबत येत्या आठ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार इलियास ढोकले यांनी महाड नगर परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे.
महाड नगर परिषदेचे व महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाने ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आगीमुळे कचरा पूर्णपणे जळून नष्ट झाल्याने या परिसरातील गावांमध्ये धुरामुळे प्रदूषण झाले आहे. नगर परिषदेच्या लाडवली येथील कचरा डेपोमुळे या परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असल्याने एप्रिल महिन्यामध्ये या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देऊन नगराध्यक्ष सुनील कविस्कर व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली होती. महाड शहरात गोळा होणारा कचरा हा थेट महाडपासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडवली येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये नेऊन या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. तसेच, या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे.
महाड शहरातून गोळा होणारा रोजचा हजारो टन कचरा हा लाडवली येथील डम्पिंग ग्राऊंडवर नेला जातो. मात्र, या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाडवली, गोडाळे देऊळकोंड व या परिसरातील 21 वाड्यांना मोठ्या प्रमाणावर या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार या परिसरातल्या ग्रामस्थांनी महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मांडली होती.
तसेच, कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणावर गोडाळे येथील नदी प्रदूषित झाली आहे. या प्रदूषित नदीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. जनावरांना तसेच ग्रामस्थांना या पाण्याचा उपयोग होत नसल्याने आजूबाजूच्या विहिरी देखील प्रदूषित झाल्या आहेत. याबाबत महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला.
कचरा पेटवल्याची चर्चा
पावसाळा जवळ आला असताना लाडवली कचरा डेपोमध्ये साठलेल्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे वर्गीकरण होणे अशक्य असल्याने व या कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त पाणी नदीत जाण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यापूर्वीच हा कचरा पेटवून देण्याचे काम झाल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.







