। नेरळ । प्रतिनिधी ।
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका 28 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुरबाड जवळील माळीपाडा येथे घडली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरबाड पोलिसांनी पती, नणंदा आणि मेव्हण्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील खांडस येथील रहिवासी विष्णू यशवंत भोईर यांच्या कन्या देवयानी हिचा विवाह एप्रिल 2015मध्ये मुरबाड तालुक्यातील माळीपाडा येथील कृष्णा शंकर माळी याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर, पती कृष्णा माळी हा ‘माहेरून पैसे घेऊन ये’ म्हणून देवयानीला त्रास देऊ लागला. यातच मेव्हणा परशुराम भोईर हा टोमणे मारून तर नणंदा मनिषा भोईर आणि सविता लोंगले या लहान-सहान कारणांवरून वाद घालून पतीला भडकावत असत, व तिला मारहाण करत असत. देवयानी जेव्हा- जेव्हा माहेरी येत असे, तेव्हा ती अत्यंत नाराज असायची. तिने आपल्या कुटुंबाला सासरच्या छळाची हकीकत अनेकदा सांगितली होती. “बाबा, मला आता सासरच्या लोकांचा त्रास सहन होत नाही, माझी जगायची इच्छा नाही. त्यांनी त्रास देणे थांबवले नाही तर मी आत्महत्या करेन, अशी भीती तिने आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली होती. मात्र, मुलगा लहान आहे. थोडे दिवस सहन कर, सर्व ठीक होईल, असे सांगून तिचे कुटुंबीय तिची समजूत काढत होते.
दरम्यान, गुरवार दि.28 मे 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवयानीने तिच्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी मृत देवयानीचे वडील विष्णू भोईर यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी पती कृष्णा माळी, मेव्हणा परशुराम भोईर, नणंदा मनिषा परशुराम भोईर आणि सविता लोंगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम अरमळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे खांडस आणि मुरबाड परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.







