। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये काही व्यक्तींनी बनावट नावे आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून एक बोगस कंपनी स्थापन करण्याचा कट रचला आणि धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील ‘कोरस कंपनी’ची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक केली. या घटनेमुळे एमआयडीसी क्षेत्रात खळबळ उडाली असून, रोहा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये एका महिला आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश उन्नीकृष्णन नायर, आशिष जैन, कल्पना चावला, योगेश सकपाळ व हीर यादव असे परप्रांतीय आरोपी व्यक्तींची नावे आहेत. या पाच जणांनी आपसात संगणमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व कागदतपत्रांच्या आधारे धाटाव एमआयडीसीतील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून 1500 किलो ग्रॅम आंब्रोक्सल एचसीएल आयपी ही औषधी पावडरचा कच्चा माल घेतला. या व्यवहारापोटी सदर भामट्यांनी कंपनीला 30% रक्कम अदा केली उर्वरित 70% रक्कम काही दिवसानंतर अदा केली जाईल असे आपसात ठरले होते. दिलेल्या वेळेत कंपनीला उर्वरित जवळपास 35 लाख रुपये रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली जात नाही. म्हणून कंपनीकडून वारंवार तगादा लावण्यात आला. त्यानंतर दि.12 नोव्हेंबर 2025 ते 29 मे 2026 या दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचा अंदाज येताच कंपनी व्यवस्थापकांनी पोलीस ठाण्यात धाव ठोकली. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र शिवदास पाटील रा. पारसीवाडी कोपरी जि.ठाणे यांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच आरोपी पसार झाले असून, पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यकांत पवार करीत आहेत.







