| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील पीर डोंगरी आणि फणस डोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या मालकीच्या जागांवर गेल्या 15 ते 20 वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याने या भागात झोपडपट्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेण नगरपालिकेला पाणी, वीज, रस्ते आणि इतर नागरी सुविधांच्या समस्या सोडवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिसरातील धोकादायक परिस्थितीचे गंभीर उदाहरण दोन दिवसांपूर्वी समोर आले आहे. एका घराच्या बांधकामाचे काम सुरू असताना वेल्डिंग करत असलेल्या कामगाराला घरावरून गेलेल्या जिवंत विद्युत तारेचा जोरदार धक्का बसला. सुदैवाने त्याचा जीव वाचला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे संबंधित घरावरून थेट विद्युत वाहिनी गेलेली असतानाही घरमालकाने कोणतीही सुरक्षितता न बाळगता बांधकाम सुरू ठेवले. महावितरणकडून काम बंद करण्याची लेखी नोटीस देण्यात आली असतानाही आजही काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता तबसुम सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित घरमालकाला काम बंद करण्याबाबत लेखी नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र, नोटीसनंतरही जर जीवघेण्या परिस्थितीत बांधकाम सुरूच राहत असेल, तर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.





